समाजात चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो. या पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी रायगडभूषण पुरस्काराने गौरवले जाते. रायगड जिल्हा परिषदेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांसाठी ४५ लोकांची निवड करण्यात आली होती. कुरुळ येथील क्षात्र्यैक्य माळी समाज हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. रायगड जिल्ह्य़ाला सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. आजही अनेक लोक त्यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत आहे. अशा व्यक्तीच्या प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांना रायगडभूषण पुरस्कार दिला जातो. आज ज्या ४५ व्यक्तींना रायगडभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, त्यांचे काम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी या वेळी सांगीतले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात बाबासाहेब आंबेडकरांची साथ करणाऱ्या सुभद्रा धोत्रे असो अथवा वयाच्या अकराव्या वर्षी हिमालयातील फ्रेंडशिप शिखर सर करणारी समृद्धी भुतकर असो, त्यांचे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असेही गायकवाड म्हणाल्या.
   या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, बांधकाम सभापती संजय जांभळे, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पाटील, नीलिमा पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आणि शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील उपस्थित होते.  
सचिनदादा धर्माधिकारी (ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे नातू) यांना विशेष रायगडभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, मात्र ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. नानासाहेबांच्या समाजप्रबोधनाचा वसा पुढे चालविणाऱ्या सचिनदादांना विशेष रायगडभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल अशी घोषणा या वेळी करण्यात आली. स्वतंत्र कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल, असेही जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले. तर लावणीसम्राज्ञी सुलोचणा चव्हाण यांनाही रायगडभूषण पुरस्काराने गौरवीत करण्यात येणार होते, मात्र त्या देखील आज उपस्थित राहू शकल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा