Ayesha Takia husband Farhan Azmi : समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल बादशाह औरंगजेब क्रूर शासक नव्हता असं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. औरंगजेबाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार अबू आझमी यांनी माफी देखील मागितली आहे. दुसऱ्या बाजूला, त्यांचे पूत्र देखील अडचणीत आले आहेत. अबू आझमी यांचे पूत्र व व्यावसायिक फरहान आझमी यांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी दोन स्थानिक नागरिक, फरहान आझमी व त्यांचा चालक शाम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. फरहान यांनी भांडणादरम्यान पिस्तूल दाखवून नागरिकांना धमकावल्याचे व्हिडीओ समोर आले होते. सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे कार चालवल्यामुळे फरहान आझमी यांचा नागरिकांशी वाद झाला होता.

फरहान आझमी हे ‘वॉन्टेड’फेम अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) हिचे पती आहेत. ती तिच्या पतीच्या बचावासाठी पुढे सरसावली आहे. आयेशा सध्या मनोरंजन सृष्टीपासून लांब असली तरी ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. ती समाजमाध्यमांवर तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पतीचं गोव्यात झालेलं भांडण, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल आयेशाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने गोव्यात महाराष्ट्राबद्दल अतिशय द्वेष असल्याचंही म्हटलं आहे.

कोण आहेत फरहान आझमी?

आयेशाचे पती फरहान आझमी हे व्यवसायासह राजकारणातही सक्रीय आहेत. त्यांनी २०१० पासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेच्या रुपेश म्हात्रे यांनी त्यांचा २ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये ते महाराष्ट्र सपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष बनले. याच वर्षी त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील ते अपयशी ठरले. २०१८ मध्ये त्यांनी सपाच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र ते सपामध्ये अजूनही काम करत आहेत. फरहान आझमी हे मोठे व्यावसायिक असून त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मुंबई व गोव्यात त्यांची अनेक हॉटेलं आहेत.

लग्नाला वडिलांचा विरोध

सक्रीय राजकारणात येण्याआधीच फरहान आझमी उद्योगधंदे करू लागले होते. रेस्तराँ व हॉटेल व्यवसायापासून त्यांनी सुरुवात केली. दरम्यान, २००९ मध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिच्याशी निकाह केला असून या दाम्पत्याला एक मुलगा आहे. आयेशा हिंदू असल्यामुळे अबू आझमी यांचा या लग्नाला विरोध होता अशी चर्चा तेव्हा रंगली होती. मात्र, फरहान यांच्या हट्टापुढे अबू आझमी यांनी माघार घेतली. लग्नानंतर आयेशाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

शिक्षण व संपत्ती किती?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी फरहान आझमी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तेव्हा त्यांच्याकडे ६६ कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू व एक स्कोडा कार आहे. त्यांनी केवळ एचएससीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

Story img Loader