शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या ही सर्वांना उर्जा आणि प्रेरणा देणारी जागा आहे. त्यामुळे शिवसेना याचा कधीच राजकीय फायद्यासाठी वापर करणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. आदित्य ठाकरे या अगोदरच अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, करोनामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच्या नावावर एकमत
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देशातील अनुभवी नेते आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी मी शरद पवारांसोबत चर्चा केली. मात्र, त्यांनी राष्ट्रपती निवडणूक लढवणयासाठी नकार दिला असल्याचे राऊत म्हणाले. पण जर शरद पवारांनी मनावर घेतलं तर राष्ट्रपती पदासाठी त्यांच्या नावावर एकमत होऊ शकते असेही राऊत म्हणाले. ‘देशाला राष्ट्रपती हवे असतील तर शरद पवार आहेत.अनेक रबर स्टॅम्प तर अनेक रांगेत आहेत. राष्ट्रपती पद कुणाला द्यायचे हे आता राज्यकर्त्यांवर अबलंबून आहे. उद्या १५ जून रोजी ममता बॅनर्जीने राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. शरद पवार त्या उपस्थित राहणार आहेत. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचेही संजय राऊत म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत मलाही हरवण्याचा प्रयत्न
काही लोकांना दुसऱ्याचं चांगले बघवत नाही, राज्याचे चांगले बघवत नाही. राज्यात कोणी काही चांगल करत असेल तर त्यात अडथळा आणण्याचे हेच त्यांच उद्धिष्ठ असतं. आणि ते यालाच हिंदुत्व समजतात, असे म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला. भाजपाने राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकली त्यात एवढं काही विशेष नाही, देशात हरणे आणि जिंकणे सुरुच असते. मी फक्त ४२ मतांच्या कोट्यावर निवडणुकीत उभा होतो. मलाही हरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे एक मत बाद झाले तरीपण मी जिंकलो असे राऊत म्हणाले.