महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने आठ, काँग्रेसने सात, शरद पवार गटाने पाच आणि अजित पवार गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, कल्याण लोकसभेबाबत कोणत्याही पक्षाने अद्याप निर्णय घेतला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, श्रीकांत शिंदे यांना यंदा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना ठाकरे गटाने मात्र या मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या आठ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसेच हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. त्यामुळे या जागेबाबत महायुतीत तिढा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे कल्याण लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणं अद्याप बाकी आहे. अशातच महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला आहे. महायुतीत हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला असल्याचं बोललं जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.
अयोध्या पौळ यांनी स्वतःच एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी (अंमलबजावणी संचालनालय), आयटीसारखी (आयकर विभाग) ताकद आहे, स्वयंघोषित जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा पक्ष ज्यांच्याबरोबर युतीत आहेत अशा मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि साईनाथ दर्गे यांचे आभार.
हे ही वाचा >> “रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
दरम्यान, अयोध्या पौळ यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने खरंच अयोध्या पौळ यांना उमेदवारी दिली आहे का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसेच ठाकरे गटाने अद्याप त्यांच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही.