येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील हजारो दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. तसेच मंदिर ट्रस्ट या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकतील. दरम्यान, मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २२ जानेवारी रोजी हाफ डे घोषित केला आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही मोठा निर्णय जाहीर केला आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोव्यापाठोठ महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती की, राज्य सरकारने येत्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. राज्य मंत्रिमंडळाने ही मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे.
महाराष्ट्राआधी उत्तर प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड सरकारने २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तर केंद्र सरकारने हाफ डे घोषित केला आहे.
हे ही वाचा >> ७२१ फूट उंचीचे जगातील सर्वोच्च राम मंदिर भारतात नाही तर ‘या’ देशात होणार पूर्ण! वैशिष्ट्य व खर्च जाणून व्हाल थक्क
सहा दिवस बँका बंद
हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त २५ जानेवारी रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशीदेखील बँका बंद असतील. २७ जानेवारी रोजी या महिन्यातला चौथा शनिवार असल्याने याही दिवशी बँका बंद असणार आहेत. २१ आणि २८ जानेवारी रोजी रविवार आहे. तर २२ जानेवारी रोजी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याचाच अर्थ २१ जानेवारी ते २८ जानेवारी या आठ दिवसांपैकी केवळ दोनच दिवस (२३, २४ जानेवारी) बँका सुरू असतील.