आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यामध्ये निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटरवरुन तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. तांबे हे पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा >> नितीन गडकरी ते सुप्रिया सुळे… बालाजी तांबेंना श्रद्धांजली अर्पण करताना कोण काय म्हणालं?

शरद पवार यांनी तीन ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी, “ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे,” असं म्हटलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी बालाजी तांबेकडून उपचार घेतल्यासंदर्भातील आठवणींना उजाळा दिलाय. , “वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे,” असं पवार म्हणालेत.

तर तिसऱ्या आणि शेवटच्या ट्विटमध्ये पवारांनी, “त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हटलं आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला तांबे यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedacharya balaji tambe passes away at 81 sharada pawar share condolence message scsg