सातारा : कवी बा. सी. मर्ढेकर यांचे सातारा जिल्ह्यातील स्मारकाचे अनावरण करून ते लोकांसाठी लवकरच खुले करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मावळा फाउंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांचा ८१ वा वाढदिवस गौरव सोहळ्याप्रसंगी पवार बोलत होते. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे व इतर उपस्थित होते.
पवार म्हणाले, माध्यमांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी पाहिजे. प्रत्येक लढ्यात ग्रामीण भागातील पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे राहिले असून, ब्रिटिशांच्या काळातही चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. पत्रकारिता हे बुद्धिमत्तेचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात काम करताना कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड दिली पाहिजे. पत्रकारांनी काम करताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मकरंद पाटील म्हणाले, पत्रकार आणि साहित्यिक समाजात घडणाऱ्या सत्य परिस्थितीवर भाष्य करतात. सातारा जिल्ह्याला साहित्य क्षेत्राचा वारसा लाभलेला असून, या क्षेत्रातील अनेक मोठी व्यक्तिमत्त्व जिल्ह्यात घडली आहेत.
बेडकीहाळ म्हणाले, बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण लवकर व्हावे, पत्रकारांचे प्रश्न समजून घेणारे अजित पवार पत्रकारांच्या पाठीशी उभे राहत असून, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. प्रा. मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन केले, नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले.