ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीला २६ डिसेंबरपासून सुरुवात झाली, तर गडचिरोली जिल्हय़ातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने २३ डिसेंबरला ४० वष्रे पूर्ण केली.
आनंदवनातील श्रध्दावन या समाधीस्थळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भारती आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू आणि नारायणराव हक्के उपस्थित होते. कुष्ठरुग्णांचे दु:ख वेचण्यासाठी बाबांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाला शुक्रवारी ६० वष्रे पूर्ण होत आहेत. बाबांची जन्मशताब्दी, आनंदवनाची षष्टय़ब्दीपूर्ती आणि लोकबिरादरीची चाळिशी असा योग जुळून आला असला तरी बाबा, साधनाताई हयात नसल्याचे दु:ख आनंदवन व लोकबिरादरी प्रकल्पाशी नाळ जुळलेल्या प्रत्येकांच्या मनात आहे. बाबांची तिसरी पिढी कौस्तुभ, दिगंत, अनिकेत, शीतल सक्रिय झाली आहे.
आनंदवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना महारोगी सेवा समितीचे सहसचिव कौस्तुभ आमटे यांनी, प्रकल्पाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले,ह्वसमाजाने नाकारलेल्या लोकांच्या परिश्रमातूनच आनंदवन साकारले. त्या नाकारलेल्या लोकांना मिळालेल्या आत्मसन्मानाचे प्रतीक आनंदवन आहे. बाबा व साधनाताईं देहाने अस्तित्वात नाहीत. मात्र, त्यांनी रूजविलेल्या जीवनमूल्यांचे अस्तित्व कायम आहे. त्याच्या पूर्ततेसाठी मोठय़ा निधीची गरज आहे. आनंदवन ही समाजाची चळवळ व्हावी.ह्व
आनंद अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘माणूस माझे नाव’ या बाबांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. भारती आमटे यांनी बाबांचे जन्मशताब्दी वर्ष हे शक्तिपर्व म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या जीवनावर आधारित ‘मी एक आनंदयात्री’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले.
नाशिक येथील आनंदवन मित्र मंडळाच्या महिला मंडळाव्दारे भक्तिगीत कार्यक्रम झाला. जन्मशताब्दीनिमित्त डॉ. विकास व डॉ. प्रकाश आमटे यांनी आनंदवन व हेमलकसा प्रकल्पांतील आठवणींना उजाळा दिला. लोकबिरादरी प्रकल्पाने ४० वष्रे पूर्ण केल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बाबा व साधनाताई यांच्याबरोबर ४० वर्षांपूर्वी हेमलकसा येथे दाखल झालेल्या शरदभाऊ, गोविंदभाऊ, रामचंद्रभाऊ व लक्ष्मणभाऊ या चार जुन्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमांचे उद्घाटन केले. लोकबिरादरी आश्रमशाळेतील मुलांनी वैज्ञानिक जत्रा आयोजित केली होती. या वैज्ञानिक जत्रेला भामरागड व परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. २६ डिसेंबर रोजी लोकबिरादरीत बाबांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, दिगंत, अनिकेत, विलास मनोहर व प्रकल्पातील सर्व जण उपस्थित होते.
विलास मनोहर यांनी लिहिलेल्या व मनोविकास, पुणे व्दारा प्रकाशित ‘मला (न) समजलेले बाबा’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन आश्रमशाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी केले.
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’
बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षांत डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजून तारीख निश्चित झाली नसली तरी डबिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांच्या भूमिकेत अभिनेते नाना पाटेकर, मंदाकिनी आमटे यांच्या भूमिकेत सोनाली कुळकर्णी आहेत. दिग्दर्शन अॅड. समृध्दी पोरे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण भामरागड, हेमलकसा व लोकबिरादरी प्रकल्पात झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा