साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती केल्याचा दावा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी येथे केला. ही नियुक्ती योग्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी या विषयावर भाष्य केले. बाबा भांड यांची नियुक्ती करण्यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडून त्यांच्याबाबत माहिती मागवली होती. त्यांनी नियुक्तीस कोणती अडचण नसल्याचे कळवल्यानंतरच आपण नियुक्तीचा निर्णय घेतला. वीस वर्षांंपूर्वी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे आरोपपत्रच अजून दाखल नाही. यावरून त्यांच्यावरील आरोपाचे गांभीर्य लक्षात येते असे सांगत आपल्या निर्णयाचे तावडे यांनी समर्थन केले.
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यास महाराष्ट्र पेटेल, अशी धमकी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली, त्यावर तावडे म्हणाले की, पुरंदरे यांच्याबद्दल बोलण्याची आव्हाड यांची लायकीही नाही. धमकीची दखल कोणीही घेणार नाही. स्वतचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी नकारात्मक मुद्दा घेण्यापेक्षा आव्हाड यांनी दुष्काळासारखा सकारात्मक मुद्दा घेतला असता, तर ते अधिक बरे झाले असते, या शब्दांत त्यांनी आव्हाडांना चिमटा काढला.
तब्बल ३४ वर्षांनंतर उस्मानाबाद येथे दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या (शुक्रवार) मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यावर तावडे म्हणाले की, राष्ट्रवादीत राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींची काही किंमत राहिलेली नसल्यामुळे स्वत शरद पवारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, हेच यावरून दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा