कीर्तनकार आणि निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर काही वेळापूर्वीच नवी मुंबईतल्या नेरुळ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी संप्रदायचे अनेक वारकरी, सातारकर यांचे कुटुंबीय यांनी साश्रू नयनांनी बाबा महाराज सातारकर यांना अखेरचा निरोप दिला. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदान गाऊन साश्रू नयनांनी बाबा महाराज सातारकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
बाबा महाराज सातारकर यांचे नातू चिन्मय महाराज सातारकर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये असलेल्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत बाबा महाराज सातारकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना ‘बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.
बाबा महाराज सातारकर यांची परंपरा त्यांची कन्या पुढे चालवते आहे
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानानं घेतलं जातं असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती! आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.
शास्त्रीय गायनाचेही धडे
बाबा महाराज सातारकर यांनी जसं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं, तसंच त्यांनी शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. ११व्या वर्षापासूनच त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते.
फेब्रुवारी महिन्यात पत्नी रुक्मिणी सातारकर यांचंही निधन
दरम्यान, याचवर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी ह. भ. प. रुक्मिणी उर्फ माई सातारकर यांचंही ८६व्या वर्षी निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांच्यासमवेत रुक्मिणी सातारकर यांनीही वारकरी संप्रदाय परंपरा पुढे वाढवण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. खाद्यसंस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखनही केलं होतं.