योगगुरू रामदेव बाबा यांचा विश्वास
नांदेड : योग हा नुसता शारीरिक व्यायाम नसून जीवनाचे श्रेष्ठ आचरण आहे. योग शुद्ध विज्ञान आहे. योगामध्ये जग रोगमुक्त, हिंसामुक्त करण्याची शक्ती आहे, असा विश्वास योगगुरू रामदेवबाबा यांनी गुरुवारी येथे आयोजित वार्ताहर परिषदेत बोलताना व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी रामदेवबाबा हे गुरुवारी नांदेडात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहातील मिनी सह्यद्री अतिथिगृहात वार्ताहरांशी संवाद साधला. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पतंजली योग समितीचे केंद्रीय सचिव डॉ. जयदीप आर्या, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना रामदेवबाबा म्हणाले,की योगसाधना ही कोण्या पंथाची, सांप्रदायाची नसून जगभरातील २०० देशांत योग केला जातो. यात मुस्लीम व ख्रिश्चन राष्ट्रांचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग, आयुर्वेद, संस्कृती, स्वदेश, संस्कार आदींचा प्रचार केला आहे. त्यांच्या कार्याने देश गौरवान्वित झाला आहे, असेही ते म्हणाले. योग अभ्यासक्रमात आला तर जगभरात एका दिवसासाठी १०० कोटी रुपयांची बचत होईल. उद्याच्या योगदिनाच्या कार्यक्रमात देशात तीन कोटी तर जगभरात १५ ते २० कोटी नागरिकयोग करतील, असे रामदेवबाबा यांनी सांगितले.
हिंदू, मुस्लीम यांचे पूर्वज एकच आहेत, हे मी दाव्यानिशी सांगू शकतो. त्यांची डीएनए केली तर हे सिद्ध होईल. राममंदिर, लोकसंख्या वाढ या मुद्यावरही रामदेव बाबा यांनी भाष्य केले.
भारत आणि पाकिस्तानातील संबंध येणाऱ्या काळात योगामुळे सुधारतील, असा विश्वास व्यक्त करून रामदेव बाबा म्हणाले,की आपण पाकिस्तानमध्येही जाऊन तिथल्या लोकांना योग शिकवू.