Baba Siddique Case : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर करत गोळीबार केला. त्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलेलं आहे.
आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणातील एक आरोपी शिवकुमार गौतम याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गुन्हेगारी संदर्भातील एक रील अपलोड केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. आरोपी शिवकुमार गौतम हा फरार असून त्याने २४ जुलै रोजी इंस्टाग्रामवर एका पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्याने “यार तेरा गँगस्टर है जानी (तुझा मित्र एक गँगस्टर आहे)”, असं लिहिलं होतं. तसेच केजीएफ चित्रपटातील ‘Powerful People Make Places Powerful’ या डायलॉगवर एक रील अपलोड केलं होतं, अशी माहिती आता समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी शिवकुमार गौतम हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं रवाना केली आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरु आहे.
१२ ऑक्टोबरला काय घडलं होतं?
१२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे या ठिकाणी बाबा सिद्दीकी हे त्यांच्या मुलाच्या ऑफिसकडे जात होते. त्यावेळी दसरा असल्याने लोक फटाके वाजवत होते, या फटाक्यांच्या आवाजत बाबा सिद्दीकींवर तीन रुमाल बांधलेल्या लोकांनी येऊन गोळीबार केला. त्यांनी एका पाठोपाठ एक सहा राऊंड झाडले. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तर तिसरा आरोपी हा शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर आहे. शुभम लोणकर आणि शिव कुमार हे दोघं फरार आहेत. ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी प्रवीण लोणकरला पोलीस कोठडी
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते. या प्रकरणात त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली.