Baba Siddique Shot Dead बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते होते. १२ ऑक्टोबरला तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांची हत्या केली. या घटनेने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातल्या तीनपैकी दोन मारेकऱ्यांना १० पोलिसांच्या पथकाने धावत जाऊन अटक केली. जिवाची पर्वा न करता या दोन मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. या पोलिसांच्या धाडसाचा गौरव होण्याची शक्यता आहे. लवकरच या दहा पोलिसांना बक्षीस दिलं जाईल अशी चिन्हं आहेत. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच झिशान सिद्दिकींच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नेमकं काय सांगितलं?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना सांगितलं की ज्या दहा पोलिसांच्या पथकाने बाबा सिद्दीकींच्या दोन मारेकऱ्यांना जिवाची बाजी लावून पकडलं त्या सगळ्यांना लवकरच गौरवण्यात येईल आणि बक्षीस दिलं जाईल.

कोण आहेत हे १० पोलीस ?

सहाय्यक निरीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस हवालदार संदीप आव्हाड, अमोल वाकडे, सागर कोयंडे, वरिष्ठ पोलीस हवालदार अमोल पवार, सुहास नलावडे, उपनिरीक्षक बांकर, एमएसएफ गार्ड पवार या सगळ्यांना बक्षीस दिलं जाण्याची चिन्हं आहेत असं या पोलीस निरीक्षकाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

पोलीस सूत्रांनी काय माहिती दिली?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन तीन हल्लेखोर जेव्हा पळाले त्यानंतर पोलिसांनी जिवाची बाजी लावून या दोन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. गुरनैल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांना पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात अटक केली. पोलीस हवालदार संदीप आव्हाड आणि अमोल वानखेडे तसंच पवार यांनी या चौघांनाही हे आरोपी पळत असल्याचं दिसलं. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून साधारण १०० मिटर पुढे हे दोन हल्लेखोर पळाले होते. एका पार्कमध्ये हे मारेकरी शिरले. त्या ठिकाणी अंधार होता. मात्र या पोलिसांनी प्राणांची पर्वा न करता या दोघांना अटक केली. हवालादार आव्हाड यांनी या पार्कमध्ये एक जड वस्तू पडल्याचा आवाज झाला. त्या दिशेने ते धावले, त्यावेळी आरोपीने त्याच्या हातात बंदुक आहे कुणाला काही झालं तर जबाबदारी माझी नाही असं हा हल्लेखोर ओरडला. तरीही धावत जाऊन आव्हाड आणि अमोल वाकडे यांनी हल्लेखोराला पकडलं. त्यानंतर दुसऱ्याही हल्लेखोराला पकडण्यात आलं.