Baba Siddique Murder Plan: १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईच्या वांद्रे परिसरात काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि या घटनेतील वेगवेगळे पदर उघड होऊ लागले. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं आहे. बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणारा प्रमुख हल्लेखोर शिवकुमार गौतम याच्या कबुलीजबाबात दाऊदचं नाव आलं आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यानंच बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी दिली होती, असं शिवकुमारनं सांगितल्याचं या वृ्त्तात नमूद केलं आहे. बाबा सिद्दिकींचा दाऊद इब्राहिमशी आणि १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट घटनेशी संबंध असल्याचं या हल्लेखोरांना सांगण्यात आलं होतं. आपला थेट अनमोल बिष्णोईशी संवाद झाला होता, त्यानं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांपैकी एकाची हत्या करण्यास सांगितलं होतं आणि त्याबदल्यात १० ते १५ लाख रुपयेही देण्याचं कबूल केलं होतं, असं शिवकुमार गौतमनं जबाबात सांगितलं आहे.
हल्लेखोर, नियोजन आणि हत्या!
शिवकुमार गौतमला नोव्हेंबर महिन्यात नेपाळला पळून जाताना अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या कबुलीजबाबानुसार, स्नॅपचॅटद्वारे संवाद साधून हत्येचा कट रचण्यात आला. शुभम लोणकरनं आपण बिष्णोई गँगसाठी काम करत असल्याचं गौतमला सांगितलं. जून महिन्यात शुभमनं गौतम आणि धर्मराज कश्यप (दुसरा हल्लेखोर) यांना हत्येच्या बदल्यात १० ते १५ लाख रुपये मिळू शकतात, असं सांगितलं. तेव्हा त्यानं फक्त बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी ही दोन नावं हल्लेखोरांना सांगितली.
अनमोल बिष्णोई म्हणाला, “डर लग रहा है क्या?”
हल्लेखोरांशी बोलल्यानंतर शुभमनं स्नॅपचॅटच्या मदतीने थेट अनमोल बिष्णोईशी व्हिडीओ कॉलवर संपर्क साधला. अनमोल बिष्णोई कॉल हल्लेखोरांना म्हणाला, “डर लग रहा है क्या?” असं गौतमच्या कबुली जबाबातून समोर आलं आहे. तसेच, जेवढे पैसे लागतील, तेवढे शुभम लोणकरकडे मागण्यासही अनमोल बिष्णोईनं हल्लेखोरांना सांगितलं.
यानंतर काही दिवसांनी शुभम लोणकर आणि धर्मराज कश्यपनं गौतमला सांगितलं की मुंबईत राहणाऱ्या बब्बू सिंह नामक व्यक्तीकडून हत्येसाठी लागणारी शस्त्रं पुरवली जातील. हत्येनंतर शुभम लोणकर, अनमोल बिष्णोई किंवा त्यांच्या गँगमधील इतर कुणीतरी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारेल असंही ठरलं.
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दिली पिस्तुलं!
४ सप्टेंबर रोजी बिष्णोईनं गौतमला स्नॅपचॅटवर फोन करून अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ सबंधित व्यक्ती शस्त्र घेऊन येईल, असं सांगितलं. तिथे मास्क आणि टोपी घातलेल्या एका व्यक्तीनं आपल्याला दोन पिस्तुलं आणि काही काडतुसं असणारं एक लाल रंगाचं पार्सल सोपवलं असं गौतमनं कबुलीजबाबात सांगितलं आहे. तसेच सिद्दिकींच्या घर, कार्यालयाची रेकी करण्यासाठी एक काळ्या रंगाची बाईकही आपल्याला देण्यात आली होती, असं त्यानं नमूद केलं आहे.
हल्लेखोरांनी खोपोलीजवळील निर्जन ठिकाणी पिस्तुल चालवण्याचा सराव केला. “१२ ऑक्टोबर २०२४ च्या संध्याकाळी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग हे नेहमीप्रमाणे बॅगांमध्ये पिस्तुलं घेऊन बाहेर पडले. धर्मराजनं एक स्प्रेदेखील सोबत ठेवला होता. आम्ही तिघांनी कुर्ला ते खेरवाडी जंक्शनपर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली. तिथून आम्ही झिशान सिद्दिकीच्या कार्यालयापर्यंत चालत गेलो आणि बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी येण्याची वाट पाहायला लागलो. आम्हाला कळलं की ते आधीच कार्यालयात आले आहेत”, असं गौतमनं सांगितलं.
आधी झिशान आणि मग बाबा सिद्दिकी!
“दसऱ्याचा दिवस होता. रस्त्यांवर गर्दी होती. फटाके फोडले जात होते. काही वेळानं झिशान सिद्दिकी त्यांच्या कारमधून निघून गेले. रात्री ९ च्या सुमारास बाबा सिद्दिकी बाहेर पडले. ते त्यांच्या कारच्या दिशेने जात असताना आम्हाला संधी मिळाली. आम्ही त्यांच्या दिशेनं गेलो आणि गोळ्या झाडायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे धर्मराजनं स्प्रेचा वापर केला. गोळ्या झाडल्यानंतर बाबा सिद्दिकी जखमी होऊन जमिनीवर कोसळले. आम्ही तिघांनी तिथून पळ काढला”, असं गौतमनं कबूल केल्याचं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.
हत्येनंतर काय घडलं?
बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर गौतमनं कपडे बदलले आणि शस्त्र व त्याच्या मोबाईल फोनची विल्हेवाट लावली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत राहिला. शेवटी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना उत्तर प्रदेशच्या बाहरीचमधून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात मकोका न्यायालयात ४५०० हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. एकूण २६ आरोपींची नावं या आरोपपत्रात घेण्यात आली आहेत. शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिष्णोई यांची नावं वाँटेड म्हणून नमूद करण्यात आली आहेत.