Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी आमदार आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृहखात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. आपण जाणून घेऊ कोण होते बाबा सिद्दीकी?

कोण होते बाबा सिद्दीकी?

कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेच्या, बेरजेच्या राजकारणात बाबा सिद्दीकीसारखे ( Baba Siddique ) कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या वादळात मुंबईतील काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला होता. १९९९ च्या निवडणुकीत थोडी उभारी आली, त्यावेळी जे काही थोडेथोडके आमदार निवडून आले, त्यातले एक बाबा सिद्दीकी एक होते. त्याआधी १९९२ ते १९९७ या कालावधीत ते काँग्रेसचे नगरसेवक होते. अगदी लहान वयातच ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

१९८८ मध्ये बाबा सिद्दीकी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते

बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांनी १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळच्या विविध विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य म्हणून भाग घेतला,जी काँग्रेसची विद्यार्थी शाखा होती. १९८० मध्ये ते वांद्रे युवक काँग्रेसच्या वांद्रे तालुक्याचे सरचिटणीस बनले आणि पुढील दोन वर्षांत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.१८८८ मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. चार वर्षांनंतर त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरपरिषद म्हणून निवड झाली आणि पाच वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर निवड झाली.

हे पण वाचा- Baba Siddique : “बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमी दुर्दैवी, कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा..”; सुप्रिया सुळेंची पोस्ट

अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हा बाबा सिद्दीकींचा मतदारसंघ

अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आणि कार्यक्षेत्र. पक्षाचा साधा कार्यकर्ता, पदाधिकारी ते आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची पक्षाने संधी दिली. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणलं होतं.

मुंबई काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते अशी बाबा सिद्दीकींची ओळख

मुंबई काँग्रेसमधील एक महत्त्वाचा नेता अशी सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची ओळख होती. त्यांचा मुलगा आमदार झिशान हा मुंबई युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता.