Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडली होती. बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) प्रसिद्ध होते. बाबा सिद्दीकींवर तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यातल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि तिसऱ्याचा शोध सुरु आहे. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा काय घडलं? हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकींच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) नेते रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील रुग्णालयात दाखल झाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींना लिलावती रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा काय घडलं याची सविस्तर माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.
हे पण वाचा- Baba Siddique Shot Dead : राजकारणातला अजातशत्रू! गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी कोण होते?
डॉ. जलील पारकर काय म्हणाले?
“साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत.” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
बाबा सिद्दीकींवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यांच्या मृत्यूनंतर आता विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आता पायउतार झालं पाहिजे अशी मागणी केली आहे. तसंच इतर विरोधकांकडूनही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.