Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार केला. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या म्हणजे काँट्रॅक्ट किलिंग आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांना आता फ्री हँड दिला पाहिजे असंही छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी हे माझे राजकीय सहकारी होते. तसंच ते उद्योजकही होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात बाबा सिद्दीकी सहभागी झाले. सिनेकलावंत सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तेव्हा मी आणि बाबा सिद्दीकी शेजारी बसलो होतो. शनिवारी या बातम्या आल्या की बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. तसंच या बातम्याही समोर आल्या की त्यांना १५ दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.

हे पण वाचा- Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

बाबा सिद्दीकींची हत्या हा काँट्रॅक्ट किलिंगचा प्रकार

बाबा सिद्दीकींना जर धमक्या आल्या होत्या तर वाय सुरक्षा दिल्यानंतर पोलिसांचं काम संपलं का? कर्तव्य संपलं का? पोलिसांचं काम होतं की धमकी कुठून आली, कशी आली त्याचा शोध घेणं. ही बाब महत्त्वाची होती. बाबा सिद्दीकींना गोळ्या घातल्या गेल्या. हल्लेखोर हरियाणा आणि उत्तर प्रदेशातले होते. त्यांना पकडलं म्हणजे पोलिसांचं काम संपलं का? या तरुणांच्या हातात १०-२० हजार रुपये दिले जाता आणि हत्या करण्यास सांगितली जाते. बाबा सिद्दीकींची हत्या हा काँट्रेक्ट किलिंगचा प्रकार आहे. यामागचा कर्ता करविता कुणीतरी वेगळा आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना हे आव्हान आहे. मी गृहमंत्री असताना गँगवॉर वाढलं होतं, सिनेकलावंतांच्या हत्या, डॉक्टरांच्या हत्या झाल्या. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. असंही छगन भुजबळ म्हणाले.

पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे

पोलिसांना आता फ्री हँड दिला पाहिजे. जे कुणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. जे घडलं त्यात फक्त गृहमंत्र्यांची जबादारी नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही जबाबदारी आहे. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.