Baba Siddique : मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार केला. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीनपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी लिलावती रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली होती. तसंच त्यांनी या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आज माध्यमांशी संवाद साधला.
बाबा सिद्दीकी आणि माझी चांगली मैत्री होती
बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या प्रकरणातले दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यातले काही अँगल्सही आम्ही तपासत आहोत. पोलीस याबाबतची योग्य ती माहिती माध्यमांना देतील असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लिलावती रुग्णालयात त्यांनी तातडीने धाव घेतली होती. या प्रकरणावरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.
हे पण वाचा- “काही गोष्टी उघड….”, ४८ वर्ष काँग्रेसमध्ये असलेले बाबा सिद्दीकी पक्ष सोडताना नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवारांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मला असं वाटतं की, त्यांना (शरद पवार) केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचं असेल आणि बोलायचं असेल तर त्यांनी ते बोलावं. असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी वगैरे झाली हे जे सांगितलं जातं आहे त्याची अधिकृत माहिती नाही. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मूळ चौकशीवर परिणाम होणार नाही अशी जी माहिती असेल ती पोलीस देतील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांनी काय म्हटलं होतं?
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी ( Baba Siddique ) यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. असं शरद पवार म्हणाले होते. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या गंभीर घटनेतही शरद पवारांना खुर्ची दिसते आहे असं म्हणत उत्तर दिलं आहे.