Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडली होती. बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकी प्रसिद्ध होते. आज रात्री साडेआठच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) तीन अज्ञातांनी गोळीबार केला. गोळीबारात बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) जखमी झाले. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर आता सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
काय आहे सुप्रिया सुळेंची पोस्ट?
अतिशय धक्कादायक! “मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी. अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली.
रोहित पवारांची पोस्ट काय?
रोहित पवार यांनीही पोस्ट करुन बाबा सिद्दीकींना श्रद्धांजली वाहिली आहे.ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त हे अत्यंत धक्कादायक आहे. सिद्दिकी परिवारावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकींच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे. असं समजतं आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
बाबा सिद्दिकींवरील गोळीबारासंदर्भात मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, बाबा सिद्दिकींवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडण्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.