राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा चहुबाजूंनी तपास करत आहेत. याप्रकरणी दोन हल्लेखोरांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर शिवकुमार नावाचा आरोपी फरार आहे. या हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार हा यूपीच्या बहराइच येथील रहिवासी आहे. त्यांच्या आईने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला या घटनेबाबत आज सकाळी माहिती मिळाली. माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा. त्यासाठीच पुण्याला जातोय असं त्याने सांगितलं होतं. तो मुंबईत काय करत होता, हे आम्हाला माहिती नाही. तो १८-१९ वर्षांचा आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांत त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही, त्यामुळे तो आता कुठं आहे, आम्हाला माहिती नाही, असं त्याच्या आईने सांगितलं.

हेही वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, “शरद पवारांना इतक्या गंभीर घटनेनंतरही खुर्ची दिसते…”

याप्रकरणातील अन्य आरोपी गुरमैल सिंग याची आजी फुली देवी यांनीही इंडिया टुडेशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. २०१९ मध्ये मध्ये एका हत्येचा आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला, तेव्हा काही मिनिटांसाठी तो घरी आला होता. त्यानंतर तो निघून गेला. तेव्हापासून आमचा त्याच्याशी काहीही संपर्क नाही, असं त्यांनी सांगितलं.

याशिवाय या प्रकरणातील तिसरा आरोपी धर्मराज कश्यप याच्या आईने यासंदर्भात भाष्य केलं. धर्मराज पुण्यात भंगाराचं काम करण्यासाठी गेला होता. आम्हाला एवढंच माहीत आहे. तो मुंबईत कसा पोहोचला याबाबत आम्हाला माहिती नाही. या वर्षी होळीला तो घरी आला होता, त्यानंतर गेला तो आलाच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”

बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?

बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba siddique shot dead murder accused family member reaction softnews spb
Show comments