Baba Siddique Shot Dead Breaking News : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हत्या झाली. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, वाय दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांची हत्या कशी झाली? हे आरोपी प्रशिक्षित होते का? हत्येची सुपारी कोणी आणि का दिली? असे अनेकविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींची आज सुटीकालीन न्यायालयात सुनावणी झाली. त्यापैकी एकाला २१ ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे. या सुनावणीत पोलिसांनी न्यायालयात अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही आरोपी विविध गुन्ह्यांसाठी हरियाणा तुरुंगात शिक्षा भोगत होते. यावेळी त्यांची भेट लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांशी झाली होती. तेव्हाच या तिघांना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालायत दिली.

गुन्हा करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल शस्त्र आणि वाहन कोणी पुरवले याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले. या हत्येमागील कारण आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. “त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता, याचाही तपास करावा लागेल”, असं सरकारी वकील पुढे म्हणाले.

हेही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हल्लेखोरांची लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांशी कुठे झाली होती भेट? मुंबई पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं?

सिद्दीकी यांना मारण्यासाठी तीन लाखांची सुपारी

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपी कुर्ल्यात महिन्याभरापासून १४ हजार रुपये भाड्याने राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार आरोपींना अडीच ते तीन लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. हे पैसे ते आपसांत वाटून घेणार होते.

पोलीस म्हणाले, गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि गौतम या तीन कथित नेमबाजांची यापूर्वी तुरुंगात भेट झाली होती. हे तिघेही हरियाणाच्या तुरुंगात बिश्नोई टोळीच्या सदस्याशी संपर्कात आले होते. तिथेच त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पुणे, हरियाणा, दिल्ली आणि उज्जैन येथे पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग, धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.