Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी रात्री ९ च्या सुमारास हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींनी रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक

बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी फरार आहे. त्या आरोपीचा शोध घेणं सुरु आहे. या प्रकरणाने मुंबईसह महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. हे दोघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन विरोधकांना उत्तरही दिलं आहे.

हे पण वाचा- Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी घेतली होती? पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती!

एका आरोपीला पोलीस कोठडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हत्या प्रकरणात गुरुमीत सिंग, धर्मराज कश्यप या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. तर गुन्हे शाखेने सगळा घटनाक्रम सांगितला आहे. या प्रकरणात आरोपींनी बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी घेतल्याची माहिती मुंबई पोलिसांनी आज न्यायालयात दिली.

पोलिसांनी सांगितला हत्येचा घटनाक्रम

पोलिसांनी सांगितलं की आरोपींकडून आम्ही दोन बंदुका जप्त केल्या आहेत. आरोपींनी पेपर स्प्रेही बाळगला होता. बाबा सिद्दीकींच्या डोळ्यांमध्ये हा स्प्रे फवारुन नंतर हल्लेखोर गोळीबार करणार होते. मात्र तिसरा आरोपी शिवकुमार याने थेट गोळीबार सुरु केला. यावेळी बाबा सिद्दीकींसह तीन पोलीस हवालदार होते. पण घटना इतक्या वेगात घडली की त्यांना काहीही करता आलं नाही. या गोळीबारात बाबा सिद्दीकींना गोळ्या लागल्या आणि ते खाली पडले. तसंच एका पोलिसाच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही माहिती दिली आहे.

बाबा सिद्दीकींनी अजित पवार गटात जाण्याचा मार्ग का निवडला?

२०२२ आणि त्यानंतर २०२३ साली अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना संधी दिसू लागली, त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमध्ये त्यांना ४८ वर्ष पूर्ण झाली होती. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाशी आघाडी केल्याचे माहीत असूनही बाबा सिद्दीकी यांनी राजकीय सोयीची भूमिका घेऊन पक्षप्रवेश केल्याचे बोलले गेले. २०१७ मध्ये एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका मनी लाँडरिंग प्रकरणात वांद्रे येथील त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले होते.

इफ्तार पार्ट्यांचे आयोजन आणि बॉलीवूडशी मैत्री

राजकारणा व्यतिरिक्त सिद्दीकी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जात होते. त्यांच्या पार्ट्यांत अनेक सेलिब्रिटींची रेलचेल असायची. २०१३ साली त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांना एकत्र आणून दोघांमध्ये अनेक काळांपासून सुरू असलेले वितुष्ट संपुष्टात आणल्याचे बोलले जात होते. दोन्ही अभिनेत्यांचा गळाभेट घेतानाचा फोटो तेव्हा बराच गाजला होता. या भेटीच्या मध्यस्थानी होते बाबा सिद्दीकी. त्यांच्यामुळे या दोघांचं वैर मिटलं होतं.