Baba Siddique राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक हल्लेखोर फरार आहे. यातील दोन हल्लेखोरांची नावं मुंबई पोलिसांनी सांगितली आहेत. यातला एक हल्लेखोर हा उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे.
वांद्रे सिग्नलवर नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर ( Baba Siddique ) गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. त्यामागचं कारण काय होतं? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघांची नावं काय?
तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातल्या दोन हल्लेखोरांची नावं समजली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करनैल सिंह हा हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. यांच्यास आणखी एक हल्लेखोर होता. जो फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आऱोपीची चौकशी सुरु आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांना हत्यारं पुरवण्यात आली होती. मुंबई पोलीस मागील आठ तासांपासून या हल्लेखोरांची कसून चौकशी करत आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील असं म्हटलं आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया काय?
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे असंही राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.