राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी फरार आहे. त्या आरोपीचा शोध घेणं सुरु असतानाच आता चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. हे चौघेही बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.

चौथ्या आरोपीची ओळख पटली

एनएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चौथ्या आरोपीचं नाव मोहम्मद जीशान अख्तर असं आहे. तो ७ जून रोजी पटियाला तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे. पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांच्या संपर्कात आला होता. मोहम्मद जीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसऱ्याची चाचणी होणार; न्यायालयाचा निर्णय

एका आरोपीला पोलीस कोठडी

दरम्यान, याप्रकरणी गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप अशा दोघांना अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं आहे. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. गुन्हे शाखेकडून या दोघांची चौकशी करण्यात आली.

वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र आणि वाहन कुणी पुरवलं? याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे? आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे. “त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता. त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता, याचाही तपास करावा लागेल”, असं सरकारी वकिलांनी म्हटलंय.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?

बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.