भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या लेकी पंकजा आणि प्रीतम मुंडे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. पंकजा मुंडे त्यांच्या भाषणात नेहमीच गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करत असतात. आजही त्यांनी आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. “आम्ही घरात कोणतीही गोष्ट करत असू तरी बाबांविषयीच बोलत असतो”, असं आज त्या म्हणाल्या. त्या एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह त्यांची तिसरी लहान बहिण यशश्री मुंडेही उपस्थित होती.
“आम्ही प्रत्येक गोष्टीत प्राण असतात ना तेच मीस करतो. आमच्या घरांत सगळ्यांत लहान बाळ बाबा होते. आमच्या घरांत चार बायका आणि ते एकुलते एक पुरुष होते म्हणून त्यांचे खूप लाड व्हायचे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “बाबा मायाळू आणि आई कडक होती. त्यांनी कधी कपाळावर हात लावला तरी ताप आलाय का विचारायचे. त्यांचा मायाळू आणि वेल्हाळ स्वभाव होता. ते आम्ही खूप मिस करतो. आमचे बाबा माऊली होते”, असं सांगत त्या आठवणीत रमल्या.
हेही वाचा >> ना उद्धव ठाकरे, ना शरद पवार; संजय राऊतांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ‘या’ नेत्यानं केलं जिवाचं रान
“आम्ही जेवतोय, कोणता पदार्थ बनवलाय, आम्ही डायनिंग टेबलवर गप्पा मारतोय, आम्ही बाबांबद्दल एवढं बोलतो की ते आमच्यासोबत आहेत असं वाटतं. आम्ही त्यांच्याविषयीच बोलत असतो”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
“बाबा गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट राहिला नाही. पब्लिक लाईफमध्ये असल्यामुळे वाढदिवस वगैरे साजरा होणं झालंच, पण बाबा होते जीव असायचा. आमचे तिघींचे वाढदिवस, आईचा वाढदिवस आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असू देत त्यांनी कधीही चुकवलं नाही. फेब्रुवारीत माझ्या वाढदिवसाला एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होतं, पण ते संपवून रात्री घरी आलेच. ते कुटुंब एकत्र बांधून ठेवायचे. आमचं वय किंवा समज त्यांनी काढली नाही. आम्ही कोणत्याही विषयांवर त्यांच्याशी बोलू शकत होतो”, असं प्रतीम मुंडे म्हणाल्या.
“माझं आयुष्य बाबांनीच ठरवलं”
“बाबा खासदार झाले. मंत्री झाले तेव्हा मी त्यांना बाबा माझं अवतार कार्य संपलं, आता मला राजकारण करायचं नाही, असं मी त्यांना १ जून २०१४ ला म्हटलं आणि ते गेले ३ जूनला ते गेले. माझं आयुष्य मी ठरवलंच नाही. माझं सगळं जीवन बाबांनी ठरवलं. जिवंत असतानाही त्यांनीच ठरवलं आणि मृत्यूनंतरही त्यांनीच ठरवलं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.