भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर हल्ला केला आहे. करोना काळात राज्यातील तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. याकाळात राजेश टोपेंनी नुसत्या गप्प मारल्या आणि तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तसेच, केंद्रातील सरकारने लस दिल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचल्याचा दावाही लोणीकर यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये ‘धन्यवाद मोदीजी अभियाना’ची माहिती देण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बबनराव लोणीकर बोलत होते. “करोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढून बारा कोटी लस विकत घेणार, असं राजेश टोपे सांगायचे. मात्र, रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा, नुसत्या गप्पा मारल्या आणि तीन लाख लोकांचा राज्यात मृत्यू झाला,” असा आरोप लोणीकर यांनी केला आहे.
हेही वाचा : “सहानुभूतीच्या नावावर मते मागितली, नंतर फटाके फोडले” मुरजी पटेलांची ऋतुजा लटकेंवर टीका
“राजेश टोपे पहिल्या दिवशी सांगायचे लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, नंतर म्हणायचे मोदीजी लस देत नाहीत. मग केंद्र सरकारने लस दिली नसती तर, अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता. लबाड लांडग ढोंड करत, लस आणण्याचे सोंग करतं,” असा राजेश टोपेंचा कारभार असल्याची टीका बबनराव लोणीकर यांनी केली आहे.