कराड : कोळे हे माझे गाव. या गावाला एका विशिष्ट उंचीवर न्यायचे असून, कोळेच्या विकासासाठी लागेल तेवढी मदत करू, मात्र, त्यासाठी गावकऱ्यांनी हातभार लावत सहकार्य करावे, अशी अपेक्षा ख्यातनाम भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी यांनी व्यक्त केल्या.
बाबासाहेब कल्याणी हे त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी व कुटुंबीयांसह आपल्या कोळे (ता. कराड) या मूळ गावी सदिच्छा भेटीसाठी आले असता सरपंच लतिफा अमानुल्ला फकीर व ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत व सत्कार केला. महेश कल्याणी हेही उपस्थित होते. बऱ्याच वर्षांनी बाबासाहेब गावात असल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. गावात प्रथमच हेलिकॉप्टरने कल्याणी कुटुंबीय आल्याने आबालवृद्धांनी गर्दी केली होती. कल्याणींचे आगमन होताच फुलांचा वर्षाव करण्यात आला. कल्याणी कुटुंबाने आवर्जून गावातील महादेवाचे दर्शनही घेतले.
बाबासाहेब कल्याणी म्हणाले, आमच्या आजोबांनी प्रतिकूल परिस्थितीत आमच्या उद्योगविश्वाची सुरुवात कोळेमधून केली. त्यांची लोकांवर श्रद्धा होती. आम्ही आज जे काही आहोत, ते त्यांच्या पुण्याईमुळेच. मला अभिमान वाटतो की, या गावात माझा जन्म झाला. सुरुवातीला आम्ही कोळेत. नंतर कराडला आणि तेथून पुण्याला रहायला गेलो. पण, कल्याणी परिवार हा मुळचा कोळे गावाचा आहे आणि सदैव कोळे गावाचाच राहील. त्यामुळे गावात ज्या ज्या सुधारणा करायला पाहिजेत, त्या आपण करायच्या आहेत. पण त्यात ग्रामस्थांचाही हातभार लागायला हवा, त्यांचे सहकार्य लाभल्यास कोळेला आपण विशिष्ट उंचीवर नक्कीच घेऊन जाऊ असा विश्वास कल्याणी यांनी दिला.
भारत फोर्ज कंपनीच्या सीएसआर फंडातून झालेल्या कोट्यवधींच्या कामांची कल्याणी यांनी पाहणी केली. या फंडातून आणखी लागेल ती मदत, लागेल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे बाबासाहेब कल्याणी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कल्याणी कुटुंबाने गावातील लोकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. विशेषतः शाळकरी मुले व ग्रामस्थांसमवेत छायाचित्रेही काढली.