हिंगोली – काँग्रेसकडून तीन वेळा निवडून गेलेले माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जात असतानाच सोमवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार विक्रम काळे यांनी, “मामा’ला योग्य जागी बसवण्यासाठी येथे आलो आहोत” असे म्हणत गोरेगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली असली तरी त्याचा नेमका तपशील मात्र, बाहेर येऊ शकला नाही. परंतु आता गोरेगावकर शिंदे सेनेत की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे व भाऊ पाटील गोरेगावकर यांचे तसे नातेसंबंध. म्हणजे भाऊ गोरेगावकर हे बाबासाहेबांचे मामा आहेत. सोमवारी बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम काळे यांनी भाऊ गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. दरम्यान आमदार काळे यांनी “मामा तुम्ही कुठे आहात” असा प्रश्न गोरेगावकरांना केला. त्यावर ‘मी येथेच आहे’ असे उत्तर भाऊ गोरेगावकर यांनी दिले. तेव्हा “मामाला योग्यस्थानी बसवण्यासाठीच आम्ही येथे आलोत”असे आमदार विक्रम काळे म्हणाले.

दरम्यान, भाऊ गोरेगावकर यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांचा फेटा बांधून, शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. भाऊ गोरेगावकर हे आमदार विक्रम काळे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यासाठी पुढे येताच आमदार काळे यांनी, “काम फत्ते झाल्यानंतरच तुमच्या हस्ते फेटा बांधून सत्कार स्वीकारणार.” असे बोलून फेटा बांधून घेण्याचे टाळले. तसेच “मंत्री महोदय तुमच्याशी गुप्त चर्चा करणार आहेत” असे म्हणत बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे व भाऊ पाटील गोरेगावकर हे घराच्या मधल्या खोलीत गेले. बंद दाराआड या तिघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. त्या चर्चेत नेमके काय ठरले, हे मात्र समजू शकले नाही.भाऊ गोरेगावकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जातो. परंतु, अद्याप प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसल्याची चर्चा आहे. तत्पूर्वीच अजित पवार यांच्या पक्षाच्या वरील दोन नेत्यांनी भेट घेतल्याने आता माजी आमदार भाऊ गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशाच्या नावाबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

आपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश निश्चित आहे. मात्र, प्रवेशाची तारीख अद्याप ठरली नाही. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते भेटीसाठी आले होते. पण ही भेट कौटुंबिक होती. बाबासाहेब पाटील हे आपले नात्याने भाचे आहेत. -भाऊ गोरेगावकर, माजी आमदार.