दरहजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण सन १९७१ पासून सातत्याने घटल्याचे दिसून येते. सन २००१ च्या जनगणनेत तब्बल १५ जिल्ह्य़ांमध्ये मुलींचे हजारी प्रमाण घसरले. शहरी व ग्रामीण भागाचा विचार करता बीड जिल्ह्य़ातील मुलींचे घटते प्रमाण राज्यासाठी धोक्याची घंटा ठरणारे असल्याचा इशारा २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीत दिसून आल्याचे मंगळवारी येथे सांगण्यात आले. जनगणना आकडेवारीचा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यशाळेत विविध माहितीचे सादरीकरण करण्यात आले. मुलींच्या जन्मदराबाबत केलेल्या सादरीकरणात बीड जिल्ह्य़ाची स्थिती धोकादायक असल्याचेच आढळून आले.
राज्यात दरहजारी मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात २०११ च्या जनगणनेत सातने वाढ दिसून आली. २००१ मध्ये दरहजारी ९२२ मुली होत्या. दशकभरानंतर ही आकडेवारी ९२९ वर गेली.
ग्रामीण भागात दरहजारी मुलींचे प्रमाण आठने कमी झाले, तर शहरी भागात ते ३० ने वाढले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा व भंडारा या जिल्ह्य़ांमध्ये दरहजारी मुलींचे प्रमाण इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत चांगले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात मुलांपेक्षा मुलींची संख्या १२२ ने, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ३६ने अधिक आहे. मराठवाडय़ातील बीड हा यात तळाच्या क्रमांकावरील जिल्हा आहे.
मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागात मुलींचे घटते प्रमाण थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील, अशीच आकडेवारी जनगणनेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा