रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रात अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला अखेर ४० तासांनी समुद्रात सोडण्यात यश आलं आहे. गेल्या ४० तासांपासून सरकारच्या विविध यंत्रणा व्हेल माशाच्या पिल्लाला जीवदान मिळण्याकरता प्रयत्न करत होते. तसंच, पर्यटक आणि ग्रामस्थांनीही शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून व्हेल माशाला जीवदान मिळाले आहे.
सोमवारी (१३ नोव्हेंबर) समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आल्याचं पर्यटकांनी पाहिलं. तसंच, बोटक्लबच्या सदस्यांनाही हा व्हेल मासा दिसला. त्यामुळे त्यांनी तातडीने पावलं उचलत त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, महाकाय व्हेल माशाचं पिल्लू वाळूत रुतून बसलं होतं.
हेही वाचा >> ३० हत्तींच्या वजनाचा देवमासा ‘या’ गोष्टींमुळे ठरतो निसर्गाचा चमत्कार! गणपतीपुळ्यात देवमाशाचं पिल्लू कसं वाचलं?
सोमवारपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीव रक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न केले जात होते. वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतके या माशाचे वजन आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आले. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते.
रात्री ओहोटीच्या वेळी या माशाला दोरीने बांधलं आणि बोटीने ओढून खोल समुद्रात नेण्यात आलं. अखेर, ४० तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात आलं आहे. यामुळे ग्रामस्थांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.