शपथविधीनंतर अखेर १३ दिवसांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे वित्त आणि नियोजन, सहकार, कृषी, अन्न नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य ही खाती सोपावण्यात आली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. ते पन्हाळा येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “माघून आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप भेटलं आहे. अन्य राहिलेल्या लोकांच्या नशिबी काय येईल, याची माहिती नाही. पण, झालेलं खातेवाटप अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे.”
“अजित पवारांना अर्थखाते मिळू नये, असं सर्वांचं मत होतं. कारण, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र होते. तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ९० लाखांचा निधी देण्यात येत होता. पण, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांवर त्यांची नजर असेल, असं वाटतं,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
हेही वाचा : “मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा…”, अजित पवारांचं वक्तव्य
अजित पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “पाच वर्षाचा कालखंड पाहिला, तर नाहीही म्हणू शकत नाही. आणि हो सुद्धा म्हणू शकत नाही. कारण, अंदाजाच्या पलीकडे राजकारण सुरु आहे. गेल्या पाच वर्षात घडलेल्या यापूर्वी कधीच पाहिल्या नाहीत.”