२०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्यात पुन्हा राजकीय वादंग सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच विरोधी पक्षनेते अजित पवारांसह ७२ तासांचं सरकार स्थापन केलं होतं, असा गौप्यस्पोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांच्या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांना लक्ष्य करत सवाल उपस्थित केले आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “शरद पवारांकडे सक्षम नेतृत्व म्हणून महाराष्ट्र आणि देशात पाहिलं जातं. शरद पवारांना राजकारणातील खडान्-खडा माहिती आहे. मग, आपल्यात घरातील माणूस सकाळी शपथविधी करण्यासाठी जातो, हे माहिती नसेल का?,” असा प्रश्न बच्चू कडूंनी विचारला आहे.
हेही वाचा : “औरंगाबादचं नामांतर करण्याची हिंमत भाजपात नाही”; संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “ढोंगी लोक…”
“शरद पवारांनी हिरवा झंडा दाखवल्यानंतर अजित पवार शपथविधी घेण्यासाठी गेले होते. आता ते नाही म्हणत आहेत. पण, शरद पवार आणि विचारांना सोडून जर ते शपथविधी घेत असतील; तर मोठी बंडखोरी केली होती. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री कसं केलं. ज्यांनी बंड केलं, त्यांना पदावर बसवलं. असं जर पक्षाचं धोरण असेल, तर इमानदारीने राहणाऱ्या आमदाराचं काय,” असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केला.
हेही वाचा : उपमुख्यमंत्र्यांचे विश्वासू सचिव सुमित वानखेडे यांचा वारंवार होणारा वर्धा जिल्हा दौरा; रहस्य काय, वाचा…
“बंड करणाऱ्यांचं स्थान मोठं राहतं. नाना पटोले काँग्रेस सोडत भाजपात गेले. परत, काँग्रेसमध्ये आले. आता राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. बंडानंतर माणसाची किंमत वाढते, अशी चिन्ह आहेत,” असं विधान बच्चू कडूंनी केलं आहे.