राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू मंत्रीमंडळ विस्तारावरून जाहीररित्या भूमिका मांडत आहेत. अशात आज ( १ फेब्रुवारी ) बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून विधान केलं आहे. आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टता केली पाहिजे, असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “मंत्रीमंडळ विस्ताराचं अजूनही खरं दिसत नाही. विस्तार होईल तेव्हा होईल, त्याचा प्रश्न नाही. पण, विस्ताराच्या बाबत सर्व आमदारांची बैठक घेण्यात यावी. आमचं मंत्रिमंडळात नाव असो अथवा नसो आम्ही सरकारबरोबर असणार. कशामुळे विस्तार थांबला असून, काय अडचण आहे, हे कुठेतरी स्पष्ट झालं पाहिजे.”
हेही वाचा : अर्थसंकल्पातील ‘सप्तर्षी’वरून रोहित पवारांचा मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाले, “अजित पवारांनी…”
“कारण, पहिल्या सरकारमधून बाहेर पडत, दुसऱ्या सरकारमध्ये आलेल्या आमदारांत मोठा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची स्पष्टता केली पाहिजे,” असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “कोणत्याही परिस्थितीत मला अटक होणार”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान; म्हणाले, “केंद्रातील…”
“शिंदे गटामुळे राज्यात अस्थिरता”
दरम्यान, मंगळवारी ( ३१ जानेवारी ) शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता असल्याचं विधान बच्चू कडूंनी केलं होतं. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशी दोन्हीकडं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. अलीकडे मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, जनतेची गैरसोय होत आहे,” असं बच्चू कडू म्हणाले होतं.