शिवसेनेत फूट पडल्याने राज्यातील जनतेत नकारात्मक वातावरण झालं आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नकारात्मता मोडून काढतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथेपर्यंत ठिक होतं. मात्र, धनुष्यबाण आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदेंनी दावा टाळायला पाहिजे होता. हे एकनाथ शिंदेंना बोलून दाखवलं होतं. परंतु, काहीपण झालं तरी सत्ता पाहिजे, हा राजकारणी लोकांचा धर्म आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना पदावरून खाली केल्यामुळे जनतेत सहानभुती आहे. ती सहानभुती आजही कायम आहे. पण, एकनाथ शिंदेंच्या कामात दम आहे. एकनाथ शिंदे रात्री २ वाजताही सामान्य माणसासाठी उपलब्ध असतात. ही आपुलकीही पाहिजे.”
मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारलं असता बच्चू कडूंनी सांगितलं, “येणारं सरकार लहान पक्षाचं असेल, असं बोललो होतो. त्याच्या दोन दिवसानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. लोकांना वाटलं हे बच्चू कडूनं केलं. असं काही नसून, मी केलं असतं तर पहिल्या मंत्रीमंडळात समाविष्ट केलं नसतं का? मात्र, आमची लायकी नसल्याने समाविष्ट केलं नसेल.”
हेही वाचा : “…म्हणून आयफोनचा वापर करा”; शिवसेनेच्या नेत्याची पदाधिकाऱ्यांना सूचना
“आता दिव्यांग मंत्रालय झालं आहे. उद्धव ठाकरे असते तर झालं नसतं. एकनाथ शिंदेंमुळे दिव्यांग मंत्रालय झालं. आता फक्त दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री केलं, तर तळागळात जाऊन दुर्लक्षित झालेल्यांची सेवा करता येईल,” असं बच्चू कडूंनी सांगितलं.