महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र, हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार? यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केलं. ते नागरपूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा – महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण; संजय राऊत म्हणाले, “शिवसेना ही…”
काय म्हणाले बच्चू कडू?
आम्ही या प्रकरणाचा आधीच अभ्यास केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थित नियोजन करून ठेवलं होते. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आम्ही बंड केलं. त्यामुळे १०० टक्के सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वास बच्चू कडून यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील युक्तिवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
शिंदे गटाला कायदेशीर अडचण येणार नाही
पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केले. महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात चुका केल्या. आधी त्यांनी कारण नसताना विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेतला. त्यानंतर अविश्वास प्रस्ताव यायच्या आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे गटाला कायदेशीर अडचण येणार नाही. महाविकास आघाडीनं शिंदे गटासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या करून ठेवल्या. कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच एकनाथ शिंदेंनी बंड केलं. कायद्याच्या बाहेर कोणतीही गोष्ट केली नाही, असे ते म्हणाले.