आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर दोन्ही आमदारांमधील वाद मिटला होता. त्यातच रवी राणा यांनी ‘कुणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे,’ असा इशारा बच्चू कडू यांना दिला होता. त्यावर बच्चू कडू यांनीही प्रतिउत्तर दिलं आहे.
“रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी फुल घेऊन तयार आहे. त्यांना किती तुकडे माझ्या शरीराचे करायचे आहेत, त्यांनी सांगावे. मी हात सुद्धा लावणार नाही. त्यांनी तारीख सांगावी, मी मरण्यासाठी तयार राहतो. कोणत्या चौकात येऊ हे सुद्धा बोलावे. प्रहारच्या सभेत बोलताना कोणाचेही नावं घेतलं नव्हतं,” असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : ‘कुंकू लाव मगच बोलतो’ संभाजी भिडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल; चाकणकर म्हणाल्या, “समाजाची विकृती…”
“राणांच्या वक्तव्याची दखल घ्यावी वाटत नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. मी निवडून यायचं की नाही, हे जनता ठरवेल,” असेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
रवी राणा काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवी राणा म्हणाले की, “मी स्वत: पुढे येऊन वाद मिटवलेला आहे. पण, एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल, तर ते सहन करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देखील रवी राणा घाबरलेला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. मात्र, कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे,” असा इशारा रवी राणांनी बच्चू कडूंना दिला होता.