उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, या अर्थसंकल्पावर आता काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेवरूनच आता बच्चू कडू यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसला जमत नाही, म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे, असं ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले बच्चू कडू?

काँग्रेसला अर्थसंकल्प जमला असता, तर शिवसेना भाजपा सत्तेत नसतं. काँग्रेसला विकासाच्या गोष्टी जमत नाही. त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. निवडणूक असताना सामान्य माणसाला आधार देणाऱ्या योजना येत असतील, तर काँग्रेसने मोठ्या मनाने त्याचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच सत्तेत असलेले पक्ष राजकारण करणारच आहे. पण त्यांच्या राजकारणामुळे सामान्य माणसांचा फायदा होत असेल, तर त्याचा विरोध करण्याच कोणतेही कारण नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी जुन्याच योजनांचे सिंचन; दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान

पाच एकर शेतीची अट रद्द करावी

पुढे बोलताना त्यांनी अर्थसंकल्पात शेकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांवरही प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी पाच एकरची अट ठेवण्यात आली आहे. मात्र, आज विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. पाच एकर शेती असतानाही त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही, त्यातून काहीही उत्पन्न निघत नाही. त्यामुळे पाच एकरची जी अट ठेवली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

लेक लाडकी योजना चांगली

शेतकऱ्यांची वर्गवारी करताना, नोकरी करणारा किंवा आयकर भरणारा शेतकरी अशी वर्गवारी करायला हवी. मात्र, पाच एकर शेती आहे म्हणून शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी अट घालणं चुकीचं आहे. असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी लेक लाडकी योजनेबाबतही भाष्य केलं, लेक लाडकी योजना चांगली योजना आहे, त्याचा महिलांना चांगला फायदा होईल, आम्ही या योजनेचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – राज्य सरकारनं केली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा; कोणत्या धर्मीयांना मिळणार लाभ? एकनाथ शिंदे म्हणाले…

विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका

दरम्यान, शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी त्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला होता. तसेच भाजपा-शिंदे गट सरकारला विधानसभेतील पराभवाची भीती वाटत असून त्यांच्याकडून बेजाबदारपणे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी टीकाही विरोधकांनी केली होती.