ठाकरे सरकारमधील मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयात स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात करोना रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर बच्चू कडू यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिल्यानंतर भडकलेल्या कडू यांनी कानशिलात ठेवून दिली.
सर्वोपचार रुग्णालयातील मेसमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली होती. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची तपासणी केली तसेच कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्वयंपाकी यांच्याकडे रुग्णांसाठी लागणाऱ्या गव्हाबद्दल त्यांनी चौकशी केली. यावेळी दोघांचीही उत्तर वेगवेगळी आली. त्यांनी पुन्हा समोर समोर दोघांची चौकशी केली. त्यावेळी पुन्हा दोघांची उत्तरं निरनिराळे आल्यानं संतापलेल्या कडू यांनी स्वयंपाक्याच्या कानाखाली ठेवून दिली.
काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे कोविड रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी केली व रुग्णांच्या भेटी घेऊन विचारपूस करण्यात आली. pic.twitter.com/a7WQqAFX7f
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) April 6, 2021
याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले,”अकोल्यातील सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना चांगलं जेवण मिळत नसल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर आपण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील किचनमध्ये जाऊन पाहणी केली. पाहणी करत असताना किचन प्रभारी कर्मचारी साहेबराव काळमेठे आणि स्वयंपाकी सुनील मोरे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी किचनची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याने दररोज ५ किलो गहू लागत असल्याचं सांगितलं. तर स्वयंपाक्याने ३ किलो गहू वापरत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांना समोरासमोर घेऊन चौकशी केली. तेव्हा सुनील मोरे यांनी उत्तर बदलून ६ किलो गहू लागत असल्याचं सांगितलं. त्यानंतर राग अनावर होऊन आपण कानशिलात लगावली,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं. या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.