“लोकसभेसाठी आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही? हा संभ्रमित करणारा प्रश्न आहे. आम्ही लोकसभेची तयारी सुरू केली आहे. आम्हाला कुणी विचारलं तर एकत्र येऊ, नाही विचारलं तर विरोधात लढू. आम्ही ‘मी खासदार’ अभियान राबविण्याची तयारी करत आहोत. एका मतदारसंघात २०० ते ३०० उमेदवार उभे करण्याची आमची तयारी आहे”, अशी ठाम भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. बच्चू कडू पुढे म्हणाले, “लोकसभेसाठी सर्वाधिक उमेदवारांची यादी आम्ही जाहीर करू. जवळपास दोन ते तीन हजार उमेदवार जाहीर करण्याची तयारी आम्ही चालविली आहे.”
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “लोकांचे मतदान कुठे जाते? हे समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझं मत कुठं जातं? हे पाहण्यासाठी आम्ही शेकडो उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभे करू. जेणेकरून निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागेल, असं झालं तर आम्ही आमच्या अभियानात जिंकलो असं समजू. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रहार सर्वात पुढे राहिल.”
“त्याला कळत नव्हतं, ही सगळी राजाची…”, वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची पोस्ट चर्चेत
“आमच्या भूमिका अतिशय ठाम आहेत. आम्हाला विचारलं तर ठिक नाहीतर आम्हाला आमचे मार्ग आहेतच. आम्ही स्वाभिमानी आहोत. कुणालाही कुणाचा पक्ष असा सहजासहजी संपवता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या बाबतीत जनजागृती करण्याबाबत आम्ही अभियान घेतले आहे, ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आमच्याशी अद्याप लोकसभेसाठी कुणीही चर्चा केली नाही”, असेही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, विधानपरिषद किंवा राज्यसभेची निवडणूक असेल तर आमची आठवण काढली जाते. पण गरज संपली की कुणी आम्हाला चहासाठी सुद्धा बोलावत नाही. हे मी २० वर्षांपासून पाहतोय. त्यामुळे कोणत्या प्रश्नासाठी कधी नाक दाबायचं, हे मला चांगलं ठाऊक आहे.
शिवतारे बारामतीमधून लढले तर पाठिंबा – बच्चू कडूंची घोषणा
विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला इशारा दिला असून बारामती मधून अपक्ष लढू असे आव्हान दिले आहे. यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, जर शिवतारे आपल्या आव्हानावर कायम राहिले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.