राज्यमंत्री आणि अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावरून मोठी घोषणा केली. आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय लढणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. तसेच भोंग्याचा वाद सामोपचारानेच मिटू शकतो, वाद करून मिटणार नाही, असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, “राज्यात कोणतंही तणावाचं वातावरण नाही. तणाव निर्माण करणारी एकही घटना घडलेली नाही. ‘काम में कुछ नहीं, बातों में बहोत है’ अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारांनी राज्याचं किंवा देशाचं फार चांगलं काही होणार नाही. भोंगे हा विषय सामोपचारानेच मिटू शकतो, वाद करून मिटणार नाही.

“निवडणुकीत भोंगे का वाजवायचे?”

“निश्चितच प्रदुषण होतंय, मग ते भोंगे मंदिराचे असू दे, मस्जिदीवरील असू दे, बुद्ध विहार किंवा अगदी आमच्या राजकीय लोकांचे भोंगे असू दे. हे सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे या मताचा मी आहे. निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असं भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे. ते देखील बंद व्हावेत. यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

हेही वाचा : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दांपत्याला बच्चू कडूंचा इशारा; म्हणाले “वाघाची नखं अजूनही…”

“मी आगामी निवडणूक भोंग्याशिवाय लढणार, कारण…”

“आगामी निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय बच्चू कडू भोंगा वाजवणार नाही. मी माझा निर्णय घेतो. मी आगामी निवडणूक भोंग्याशिवाय लढणार आहे. कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे,” असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं.