अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीही अनेकदा सूचक विधानं करून चर्चेची राळ उडवून दिली होती. आज सकाळीही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण ११ वाजता निर्णय जाहीर करणार असं म्हटलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. यावेळी गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचंही सांगितलं.

“…तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती”

यावेळी बोलताना बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना घडलेल्या घडामोडी सांगितल्या. “मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो. त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिषं आली. पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो. तसेच, उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो”, असं ते म्हणाले.

“पण त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणं जुळायला लागली. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

“आम्हाला बदलत्या राजकारणाचा कंटाळा आलाय”

दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरील आपली नाराजी बोलून दाखवली. “एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे”, अशी भूमिका बच्चू कडूंनी यावेळी मांडली.

भाजपा आणि शिंदे गटातून राष्ट्रवादीला खाती देण्यास आडकाठी? संजय राऊत म्हणाले, “माझी माहिती आहे की…”

“मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण गेल्या मुख्यमंत्री अर्ध्या तासापासून खूप फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यामुळे मी त्यांची विनंती म्हणून आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे. त्यांनी १७ तारखेला भेटण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर १८ तारखेला तुम्हाला हवा तो निर्णय घ्या असं ते म्हणाले आहेत. त्यानुसार मी १८ तारखेला माझा निर्णय जाहीर करेन”, असं बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन”

आपण सामान्यांसाठी आहोत, सामान्यांसाठी राहायला पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असतील. पण त्या दुरुस्त करण्याची काळजी आम्ही करायला पाहिजे. मला दिव्यांगांसाठी, मतदारसंघासाठी वेळ द्यायचा आहे. त्यामुळे मंत्रीपद घेतलं तर तो वेळ देता येणार नाही. मी आज निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की आज कुठला निर्णय घेऊ नका. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. १८ तारखेला मी त्यासंदर्भात निर्णय जाहीर करेन”, असं ते म्हणाले.

“तिन्ही नेत्यांचं सगळं ठरलंय, विस्तार-खातेवाटपाच्या चर्चा…”, संजय शिरसाट यांचं सूचक विधान!

“आता या सरकारमध्ये असं जायचं नाही हे मी ठरवलंय”

“बच्चू कडू वैयक्तिक फायद्यासाठी कधीच नाराज होणार नाही. आम्ही सामान्य माणसासाठी लढू, मरू. स्वत:साठी नाराज होणं आमच्या मायबापानं कधी शिकवलं नाही. आमच्या थोरांनी कधी शिकवलं नाही. उद्या दोन पावलं मागे घेऊन पद घेणं आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. त्यामुळे या सरकारमध्ये आता अशा पद्धतीने जायचं नाही असं माझ्या डोक्यात मी ठाम ठरवलं आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी काम करावं असं मला वाटतं”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्टपणे समोर मांडली आहे.

“मुख्यमंत्र्यांची अडचण होऊ नये यासाठी निर्णय घेतला”

“त्यांना अडचण होऊ नये की कुणाकुणाला मंत्रीपद देणार? त्यांच्याही मागे पेच आहे. कुणीतरी माघार घेतली पाहिजे ना? त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवांचा विचार केला. आज मुख्यमंत्री या पेचात असताना सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना काय मदत करता येईल, यातून त्यांना अधिक निर्णय घेणं कसं सोपं जाईल यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे”, असंही बच्चू कडू म्हणाले.