लोकसभा निवडणुकीत ‘मराठा’ मतपेढीची ताकद दाखवण्यासाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय रद्द घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार उभे करण्यास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नकार दिला. मराठा समन्वयक गावोगावी गेले नाहीत. जे गेले त्यांनी चुकीची माहिती आणली. त्यामुळे अपक्ष उमेदवार उभं करणं शक्य नाही. तसे केल्यास उमेदवार निवडून येणार नाहीत, असं सांगत जरांगे यांनी राजकीय आखाडयातून माघार घेतली आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक पक्ष आणि नेते प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकीत मनोज जरांगे आपल्या बाजूने उभे राहिले तर मराठा समुदायाची मतं आपल्याला मिळतील असं अनेक उमेदवारांना आणि पक्षांना वाटतं. दरम्यान, आगामी निवडणुकीत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही आणि मनोज जरांगे पाटील आगमी निवडणुकीत एकत्र येणार आहात का? यावर बच्चू कडू म्हणाले, मी मुंबईच्या आमच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा केलेली नाही, मुंबईच्या दौऱ्यातही असं काही बोलणं झालं नव्हतं. मी कुठल्याही राजकीय विचाराने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नव्हता. माझा त्या आंदोलनातील सहभाग केवळ सामाजिक होता. त्यांच्याशी राजकीय गोष्टी करणं मला योग्य वाटत नाही. प्रत्येकाने त्याचा त्याचा निर्णय घ्यावा. त्यांनी युती करावी यासाठी मी काही फोन वगैरे करणार नाही.
आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे. मला मंत्रिपद न दिल्याबद्दल काही वाईट वाटत नाही. परंतु, अमरावतीची लोकसभा मात्र आम्ही लढवणारच. आता ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचारांचा झेंडा समाधीनंतरही जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार. आम्ही उमेदवार देणार आणि जिंकवणार. हीच आमची भूमिका आहे. या भूमिकेने आम्हाला खड्ड्यात घातलं तरी चालेल. परंतु, आम्ही मागे हटणार नाही.
हे ही वाचा >> “आमची लढाई हुकूमशाहीविरोधात”, बच्चू कडूंचा नवनीत राणा आणि भाजपाला टोला; म्हणाले, “त्यांची बनवाबनवी…”
अचलपूरचे आमदार म्हणाले, अमरावती जिल्ह्याचं पोस्टमार्टेम झालेलं आहे. त्यात काही राहिलेलं नाही. आता केवळ निकाल बाकी आहे. या मतदारसंघात आमचाच उमेदवार निवडून येईल. मी आधीच सांगितलं आहे की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्याबाबतचा पुढचा निर्णय महायुतीने घ्यायचा आहे. आमची लढाई राणांविरोधात आहे युतीविरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर पडावं, युतीत राहावं की मैत्रीपूर्ण लढावं हा निर्णय महायुतीकडे असेल. तो चेंडू महायुतीच्या कोर्टात आहे. याबाबत ते लोक घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू.