Amit Shah on Sharad Pawar : “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनीच संस्थात्मक स्वरूप दिलं”, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (२१ जुलै) शरद पवारांवर हल्लाबोल केला. तसेच, “महाविकास आघाडी औरंगजेब फॅन क्लब असून, श्रीमान उद्धव ठाकरे हे त्या फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, असं म्हणत शाह यांनी शिवसेनेच्या ठाकरे ठाकरे गटाच्या प्रमुखांवर टीका केली. दरम्यान, शाह यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीमधील नेत्यांनी अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच महायुतीमधील मित्रपक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी शाह यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला आहे.
शरद पवार हे जर भ्रष्टाचारी लोकांचे सरदार असतील तर मग अजित पवार कोण आहेत? असं लोक विचारू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. “अमित शाह हे बऱ्याचदा असं काहीतरी वक्तव्य करतात आणि मग ते वक्तव्य त्यांच्या अंगलट येतं”, असं म्हणत बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू म्हणाले, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सरदार असतील तर मग लोक विचारतील की अजित पवार कोण आहेत? ते भ्रष्टाचारी लोकांच्या सरदाराचे पुतणे आहेत की इतर कोणी आहेत? मला वाटतं, अमित शाह चुकून असं काहीतरी बोलून गेले आहेत. ते विसरभोळे झाले असतील. ते बऱ्याचदा असं एखादं चुकीचं वक्तव्य करतात आणि मग ते वक्तव्य त्यांच्या अंगलट येतं.
हे ही वाचा >> मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा!
मुरलीधर मोहोळ कोणत्याही चौकात भाजपाच्या कामांचा हिशोब देतील : शाह
पुण्यात आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे व राहुल गांधींचा समाचार घेतला. तसेच शाह यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्यासाठी केलेल्या कामांची आणि निधीची यादी सादर केली. केंद्रात व राज्यात सत्ता असताना, शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केलं, याचा हिशोब द्यावा, असं आव्हानही त्यांनी यावळी दिलं. ‘केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपाचा दहा वर्षांतील हिशोब देतील,’ असेही शाह यावेळी म्हणाले.