प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमधील वाद नवीन नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद मिटवला होता. पण आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामधील वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान, अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केला आहे.
मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला आवर घालण्याची गरज आहे, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर आता बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
खरं तर, एका जाहीरसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला. यशोमती ठाकूर इमानदारीच्या गोष्टी करतात. पण त्यांनी लोकसभेत माझ्याबरोबर फिरून रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या. आता रक्ताचे अश्रू काढण्याचं काम यशोमती ठाकूर करत आहेत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
नवनीत राणांच्या विधानावर बच्चू कडू म्हणाले, “सगळ्यात आधी पैसे देणारा चुकीचा आहे. त्यासंदर्भात मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यांनी (नवनीत राणा) जाहीरपणे हे विधान केलं आहे. याची चौकशी झाली पाहिजे. रवी राणांनी खरोखर यशोमती ठाकूर यांना किती पैसे दिले किंवा यशोमतीताईंनी किती पैसे घेतले? याची चौकशी व्हायला पाहिजे. राणा दाम्पत्यांना देवेंद्र फडणवीसांचं अभय आहे. ते नेहमी त्यांना अभय देतात. त्यामुळे ते काहीही बोलतात. त्यांना आवर घालण्याची गरज आहे.”
हेही वाचा- देशाचे नाव ‘भारत’ हेच राहिले पाहिजे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका…
बच्चू कडूंच्या विधानावर रवी राणांची प्रतिक्रिया
“खऱ्या अर्थाने बच्चू कडूंना आवर घालायची गरज आहे. मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करून जो माणूस काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो, त्याला आवर घालायची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनी रवी राणाला आवर घातली पाहिजे, हा सल्ला त्यांनी दिला. पण ज्या माणसाला खरी आवर घालण्याची गरज आहे, त्यांनी मला सल्ला देऊ नये,” असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं.