मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच आपल्या गटातील काही आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अयोध्येला जाऊन आले. या दौऱ्यात भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पण अनेक आमदार आणि खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. संबंधित नेत्यांनी विविध कारणं देत अयोध्या दौरा टाळला. यावरून “सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे” असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
संजय राऊतांच्या या विधानाला प्रहार संघटनेचे नेते आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे हे दबंग मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- शिंदे गटातील नाराजीबद्दल बच्चू कडूंची थेट कबुली; म्हणाले “होय, अस्वस्थता…”
संजय राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, मी नाराज नाही. सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मी त्याच कामात व्यग्र होतो. त्यामुळे मी अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडू पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामामध्ये सनी देओल आहेत. अॅक्शनमध्ये ते नाना पाटेकर यांच्यासारखे आहेत. त्यामुळे असे दबंग मुख्यमंत्री असताना आम्ही नाराज होण्याचं काहीच कारण नाही. याशिवाय बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. ७ ते ८ महिन्यांसाठी मंत्रीपद घेण्यात काहीही अर्थ नाही. शिंदे-फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला आहे. लोकांना पदापेक्षा काम करणे महत्त्वाच वाटते. आम्ही ते काम पूर्ण करतो.”