प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांची अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या गटाने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अभिजीत ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या विजयानंतर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. बच्चू कडूंना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विजयानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “हा दडपशाहीच्या विरोधातला विजय आहे. तुम्हाला माहीत आहे, या बँकेतून कर्ज मिळावं म्हणून शेतकऱ्यांना आणि संचालकालाही उपोषण करावं लागलं होतं. त्या गोष्टीचा बदला म्हणून आज आमचा विजय झाला आहे. आपल्याच कार्यकर्त्याला वाईट वागणूक दिल्यानंतर काय परिणाम होतो? हेच या निवडणुकीतून दिसलं. आम्ही नावाने कडू असलो तरी आम्ही लोकांशी गोड बोलतो, हेच या निवडणुकीतून दिसून आलं आहे.”

हेही वाचा- “कुणी म्हटलं की मशिदीसमोर आम्हाला नाचायचंय, तर…”, देवेंद्र फडणवीसांची त्र्यंबकेश्वर प्रकरणी भूमिका!

“या निवडणुकीत आम्ही सहा-सात जण अतिशय मजबूत होतो. त्यामुळेच हा विजय खेचून आणला आहे. शेतकऱ्यांबाबत असलेल्या चांगल्या भावना आणि पुण्य कर्म आमच्या कामी आले आहेत. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं मजबूत होईल. शेतकऱ्यांना कर्जासाठी वणवण फिरावं लागणार नाही. त्यांच्या दारापर्यंत आम्हाला कसं जाता येईल, हा निश्चित प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू,” असंही बच्चू कडू म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu elected as president of amravati district bank beat congress leader yashomati thakur rmm