अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढत चालला आहे. अलीकडेच रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.
याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलीस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले आहेत.
हेही वाचा- भोसरी भूखंड प्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिल्यानंतर खडसेंचे गंभीर आरोप, म्हणाले, “मला अडकवण्यासाठी…”
संबंधित प्रकरणावर भाष्य करताना रवी राणांचा एकेरी उल्लेख करत बच्चू कडू म्हणाले, “रवी राणाने जे काही आरोप केले आहेत ते त्याने सिद्ध करावे. माझ्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी रवी राणाला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देतो. एक तारखेला मी अमरावतीतील टाऊन हॉलमध्ये येतो. तिथे त्याने आपले पुरावे सादर करावेत. त्याने केलेले आरोप सिद्ध झाले तर मी त्याच्या घरी भांडी घासेन.”
हेही वाचा- “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!
“रवी राणा हा सत्तेत येऊन दुधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल, तर मी त्याला तयार आहे. तो जिथे बोलवेल तिथे जाण्यास तयार आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. शिंदे- फडणवीस सरकारमधील अपक्ष आमदारांचा वाद चव्हाट्यावर आल्याने सरकारची चिंता वाढली आहे.