Bachchu Kadu First Reaction after Defeat in Achalpur : “बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं भारतीय जनता पार्टी का म्हणत नाही?” असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. “जगभरातील अनेक देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात मग भारतात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास काय अडचण आहे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ईव्हीएमविरोधात विरोधक एकवटत असताना बच्चू कडू यांनी देखील तशाच पद्धतीची भूमिका घेतली आहे. बच्चू कडू म्हणाले, “आम्हाला काही ठिकाणी संशयास्पद आकडेवारी समोर आली आहे. परंतु, आम्ही संपूर्ण मतदारसंघातील आकडेवारी जाणून घेऊ आणि त्यानुसार भूमिका घेऊ”. बच्चू कडू हे चार वेळा अचलपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु, यावेळी त्यांचा पराभव झाला आहे.
बच्चू कडू यांना त्यांच्या पराभवाचे कारण विचारल्यानंतर ते म्हणाले, “जाती आणि धर्मावरून झालेला प्रचार महत्त्वाचा ठरला. तसेच, लाडकी बहीण योजनेने देखील काही प्रमाणात निवडणुकीवर प्रभाव टाकला. माझ्या मतदारसंघात राजकारण जिंकलं आणि सेवा हरली अशी स्थिती आहे. संपूर्ण मतदारसंघात तेच चित्र पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील चार-पाच गावातील लोक मला म्हणाले, ‘आम्ही तुम्हालाच मत दिलं. परंतु, निकालात ते मतदान दिसले नाही’. हे सगळं पाहून मला ईव्हीएमची पारदर्शकता शून्य आहे असं वाटू लागलं आहे. काही मतदार मला म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तिथल्या व्हीव्हीपॅट मशीनवर आलेल्या चिठ्ठीत देखील तसंच दिसलं. परंतु, प्रत्यक्षात तुम्हाला दिलेली मतं आकडेवारीत दिसत नाहीत’. त्यामुळे ईव्हीएमबाबत संशय उपस्थित होत आहे. जगातले बहुसंख्य देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात. मग भारतीय जनता पार्टीवाल्यांनी देखील असं म्हणायला हवं की आम्ही देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला भाजपाची हरकत का असावी?”
हे ही वाचा >> “लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया
बच्चू कडू ईव्हीएमविरोधात भूमिका घेणार?
बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमची आता ईव्हीएम विरोधात काय भूमिका असेल? त्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्ही आज आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मतदारसंघातील सर्व बूथ कार्यकर्ते देखील यात सहभागी होतील. मतदान केंद्रांवर आम्ही जे कार्यकर्ते पाठवले होते ते देखील येत आहेत. आम्ही प्रत्येक मतदान केंद्रानुसार मतदानाची आकडेवारी घेत आहोत. आम्हाला व इतर उमेदवारांना मिळालेली मतं याचा अभ्यास करत आहोत. त्यानंतर कुठे मतदान कमी पडलं, तिथल्या लोकांना प्रत्यक्ष भेटून काही माहिती घेऊ आणि मगच आम्ही नेमकी काय भूमिका घ्यायची ते ठरवू.