प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, “२०१७ साली दिव्यांग बांधवांनी नाशिक आयुक्त कार्यालयात दोन आंदोलनं केली होती. अपंगांसाठी असलेल्या निधीचा तीन-तीन वर्ष खर्च होत नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आम्हाला फोन केला. मला फोन आल्यानंतर मी आयुक्तांना दोन पत्रं लिहिली. पण आमदाराच्या पत्रालाही आयुक्तांनी उत्तर दिलं नाही. सामन्य माणसाचा अधिकार तर खड्ड्यात गेला. त्या आयुक्ताने कायद्याची ‘ऐशी की तैशी’ केली.”
हेही वाचा- मोठी बातमी: आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
“पत्र देऊनही आम्हालाही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो होतो. आम्ही मौज मजा करायला आलो नव्हतो. ज्यांना हात-पाय, डोळे नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत, म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. याउलट आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली? याचा तपास करायला हवा. हे का तपासलं जात नाही?” असा सवालही बच्चू कडूंनी विचारला.