राज्यात सध्या अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी करूनही हा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीये. रवी राणांनी घरात घुसून मारेन असं वक्तव्य केल्यानंतर आता बच्चू कडूंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया देत हा वाद आणखी पेटवायचा नाही, अशी सावध प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “आम्ही सभा घेतली आणि राणाजींचे आभार मानले. ते काल तीन वाजता म्हणाले की, बच्चू कडूंनी आभार मानले, आता वाद मिटला. नंतर सायंकाळी सहा वाजता म्हणाले की, घरात घुसून मारेन. आज पुन्हा म्हणत आहेत की वाद मिटला. यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी गोंधळ निर्माण करू नये असं मी ठरवलं आहे.”
“५० खोके घेऊन आला असं म्हणत माझा अपमान केला”
“माझ्या आणि त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला तर माध्यमांमध्येही गोंधळ निर्माण होतो, राज्यातही गोंधळ निर्माण होतो. त्यांनी बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि ५० खोके घेऊन आला असं म्हणत माझा अपमान केला. ते चुकीचं आहे. सत्ता परिवर्तन आत्ताच झालं का? इतिहास पाहिला तर अशा अनेक घटना घडल्या,” असं बच्चू कडूंनी म्हटलं.
“हा वाद आणखी पेटवायचा नाही”
“रवी राणा आणि नवनीत राणा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग आम्ही म्हणायचं का की त्यांनी पैसे घेतले? हा वाद आणखी पेटवायचा नाही. माध्यमं वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मी पेटवणार नाही. आज रात्रीच राणांना भेटणार, त्यावेळी माध्यमांनाही बोलावणार आहे. आम्ही दोघे भेटून एकाच पंगतीत जेवायला बसू,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.
“स्वतः फडणवीसांनी मला फोन करून सांगितलं की…”
मुख्यमंत्र्यांना भेटून काय सांगणार या प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघातील २० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल अशा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितलं की, आज तुम्हाला एक चांगलं गिफ्ट देणार आहे. एका महिन्यात माझ्या मतदारसंघातील माझा शेतकरी सुखावणार आहे.”
“वादानंतर असे फायदे झाले तर भांडायला काय हरकत”
“माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळणार, त्याच्या शेतात पिक उभं राहणार यापेक्षा अधिक आनंदांची गोष्ट काय असणार आहे. वादानंतर असे फायदे झाले तर भांडायला काय हरकत आहे. फक्त इतक्या खालच्या स्तरावर आरोप जायला नको,” असंही कडूंनी नमूद केलं.
“राणा काल तीन वाजता म्हणाले वाद मिटला”
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही राणांनी घरात घुसून मारू असं वक्तव्य केलं. याबाबत विचारणा केली असता बच्चू कडू म्हणाले, “राणांनी काल दोन वक्तव्यं केली. रवी राणा तीन वाजता म्हणाले की, बच्चू कडूंनी आभार मानले, आता आमचा वाद मिटला आहे. मात्र, माध्यमं ते वक्तव्य सांगत नाहीत, तर जोडे मारायचं वक्तव्य सांगत आहेत.”